लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशी खाडीपुलालगत रेल्वे पोलिसांना जखमी अवस्थेत तरुणी आढळून आली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी-मानखुर्द रेल्वेमार्गावर खाडीपुलालगत मंगळवारी सकाळी २५ वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत आढळली होती. सकाळी ६ च्या सुमारास ही तरुणी तिथे पडली असल्याचे वाशी रेल्वे पोलिसांना समजले होते. यानुसार, पोलिसांनी तिला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले होते. वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत. मात्र, वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या प्रकरणात एका व्यक्तीचा समावेश आहे की अधिक व्यक्तींचा? याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तपासासाठी विशेष पथक
वाशी रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून सर्व रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. पीडित तरुणी कोणत्या ट्रेनमध्ये व किती वाजता प्रवास करीत होती हेही तपासले जात आहे. याशिवाय सदर तरुणीचा शेवटचा संपर्क कोणाशी झाला याचीही माहिती घेतली जात असून, परिवारातील सदस्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. ती काम करीत असलेल्या ठिकाणावरूनही माहिती घेतली जाणार आहे.
अशी आली घटना निदर्शनास
वाशी रेल्वे पोलिसांना खाडीपुलावर एक महिला पडली असल्याची माहिती मंगळवारी मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जखमी अवस्थेत २५ वर्षांची तरुणी आढळून आली. तिच्या डोक्यावर जखमा झाल्या होत्या. डोक्यावर वार करून व बलात्कार करून तिला रेल्वेतून फेकले असण्याची शक्यता आहे. तरुणीला सर्वप्रथम वाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रतिक्रिया
सदर घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असून घटनेच्या अनुषंगाने उचित तपास सुरू केला आहे.
विष्णू केसरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस