मुंबई - प्रेयसी फोनवर बोलत नाही या रागातून तिच्या बरोबरच्या खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या नातेवाइकांसह पतीला व्हॉट्सॲपवर पाठवणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या सायबर सेलने उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव सौरभ जयस्वाल (३५) असे आहे. संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ओशिवरा पोलिसांच्या सायबर सेलने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला जेरबंद केले.
तक्रारदार महिलेचे आरोपीशी प्रेमसंबंध होते. प्रेयसी फोनवर बोलत नसल्याच्या रागातून आरोपीने १६ ऑगस्टला त्यांच्यातील खासगी क्षणांचे फोटो प्रेयसीच्या पतीसह तिच्या नातेवाइकांनाही व्हॉट्सॲपवर पाठवले. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने १९ ऑगस्टला पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
आरोपी उत्तर प्रदेशातील पोलिस पथकाने आरोपीचा अंधेरी, दादर, मुंब्रा परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शरद देवरे, अंमलदार अशोक कोंडे आणि विक्रम सरनोबत यांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू केला. आरोपी उत्तर प्रदेशात असल्याचे समजताच पोलिस पथक जोनपूरच्या ग्राम भोडा गावात पोहोचले आणि त्याला अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली आहे.