मुंबई - गेल्या महिन्यात प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर अंबोली पोलिसांनी बुधवारी ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबलवर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या २३ वर्षीय तरुणीने एक व्हिडीओ बनवला होता. यात तिने आरोपी समय प्रशांत दळवी (२४) हा तिच्यावर दबाव टाकत तिला दोनदा गर्भवती करत दोन्ही वेळा तिचा गर्भपात केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार अंबोली पोलिसांनी दळवीवर गुन्हा दाखल केला.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दळवी आणि तिच्या लग्नासाठी त्याची काकू आणि त्याच्या बहिणीशी बोलणे केले होते; परंतु त्यांनी आंतरधर्मीय विवाहाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर २३ मार्च रोजी, पीडितेने अंधेरी पश्चिम येथील तिच्या घरी आत्महत्या केली. तिला तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत पीडितेच्या बहिणीने तिचा फोन तपासला तेव्हा तिला त्यात दळवीच्या व्हॉट्सॲप चॅटिंगवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, परंतु तिने तो पाठवला नाही; मात्र व्हिडीओ डिलीट होऊ नये म्हणून तो दळवीला पाठवला, असे तिच्या बहिणीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेच्या आईच्या जबाबावरून दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दळवीचे गेल्या ४ वर्षांपासून तिच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. तसेच त्याने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. यातून ती दोनदा गर्भवती राहिली, परंतु त्यांचे लग्न उशिरा होत असल्याने, त्याच्या सांगण्यावरून तिला दोन गर्भपात करावा लागला.
काय आहे व्हिडीओमध्ये?पीडितेने मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या दळवी सोबत असलेल्या नात्याबद्दलचा घटनाक्रम आणि मानसिक छळाबद्दल सांगितले. मुलीने डायरीत लिहिलेले तीन पानांचे पत्रही सापडले कुटुंबाला सापडले आहे. लेकीच्या आत्महत्येनंतर आईची तब्येत बिघडल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात विलंब झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.