- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मैत्रिणीच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिने कुर्ला स्थानक गाठले. रडत असलेल्या बाळाला बाकड्यावर बसवत शेजारून खाऊ आणण्यासाठी गेली. परत आली तेव्हा बाळाच्या शेजारी पोलिसांचा फौजफाटा पाहून तिची बोबडी वळली. धाडसाने आपलेच बाळ असल्याचा दावा करत बाळाला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू होताच तिने पळ काढला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी बाळाला बाल सुधारगृहात सोडले. बाळाची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी बाळाला ताब्यात घेत, अवघ्या काही दिवसांतच या महिलेला बेड्या ठोकल्याची घटना नागपाडामध्ये घडली. काजोल डिसुजा (३०) असे अटक आरोपीचे नाव असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.नागपाडा परिसरात हे अडीच वर्षांचे बाळ आई-वडिलांसोबत राहते. २८ जून रोजी रात्री घराबाहेर खेळत असलेले बाळ अचानक गायब झाले. कुटुंबीयांनी या बाळाचा शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने त्यांनी नागपाडा पोलीस ठाणे गाठले. नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. सर्व पोलीस ठाण्यांत या बाळाची माहिती देण्यात आली. तपास सुरू असताना रेल्वे पोलिसांकडून रात्री उशिराने बाळाबाबत माहिती मिळाली. तपास पथकाने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. तेव्हा त्यांच्या ताब्यात असलेले बाळ तेच असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी रेल्वे पोलिसांनी बाळाला सोडून पळालेल्या महिलेबाबत केलेल्या वर्णनावरून ती महिला आपली मैत्रीण काजोल असल्याचे त्या बाळाच्या आईने सांगितले. २८ जून रोजी तिने बाळाचे अपहरण करून रात्री साडेदहा वाजता कुर्ला स्थानक गाठले. बाळ खूप रडत असल्याने त्याला बाकड्यावर बसवून ती खाऊ आणण्यासाठी गेली. ती खाऊ घेऊन परत आली तेव्हा काही पोलीस बाळाकडे विचारपूस करत असल्याचे दिसले. काजोलने ते बाळ आपलेच असल्याचे सांगितले. तिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिने पळ काढल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून नागपाडा पोलिसांना मिळाली.यानुसार, बाळाला ताब्यात घेत तपास पथकाने काजोलचा शोध सुरू केला. ती नागपाडा परिसरात आल्याची माहिती मिळताच गुरुवारी तिला अटक केली. काजोलकडे केलेल्या चौकशीत, बाळाला बिस्कीट खाण्यासाठी घरी नेत असल्याची माहिती तिने दिली. मात्र ती बाळाला विकण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. न्यायालयाने काजोलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मैत्रिणीचे बाळ पळविले...
By admin | Published: July 16, 2017 3:04 AM