मुंबई : तरणतलावात पोहण्यासाठी आलेल्या कांचन रोडे या २१ वर्षीय तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घाटकोपरच्या पालिका तरण तलावात घडली. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचन घाटकोपरच्या पारशी वाडीत पालकांसोबत राहात होती. एम कॉमच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या कांचनने सहा महिन्यांपूर्वीच तिने ओडीयन सिनेमाजवळील पालिकेच्या जलतरण तलावात प्रवेश घेतला होता. काल सकाळी नेहमीप्रमाणे ती तिच्या आई व मोठया बहिणीसोबत येथे पोहोण्यासाठी आली. मात्र पोहत असताना अचानक ती गटांगळया खाऊ लागली. तिच्या आईला आणि बहिणीला ही बाब समजल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यानुसार येथील कर्मचाऱ्यांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर तिला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.ही बाब पंतनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तिला आकडीचा त्रास होता. त्यामुळे पाण्यात उतरल्यानंतर तिला आकडी आली असावी. त्यानंतर तीचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या तरुणीच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर धनावडे यांनी दिली.
पालिका तरणतलावात बुडून तरुणीचा मृृत्यू
By admin | Published: April 05, 2015 1:55 AM