मुलींना उच्च शिक्षण नकोसे? महाराष्ट्रातील नावनोंदणीच्या संख्येत घट, देशात मात्र सहा लाखांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:48 AM2024-01-29T10:48:51+5:302024-01-29T10:49:02+5:30
Education: देशभरात मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात असतानाच जिथे महिला साक्षरतेच्या चळवळीचा आरंभ झाला, त्या महाराष्ट्रात उच्च शिक्षणाकडे मात्र मुलींनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक चित्र आहे.
मुंबई - देशभरात मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात असतानाच जिथे महिला साक्षरतेच्या चळवळीचा आरंभ झाला, त्या महाराष्ट्रात उच्च शिक्षणाकडे मात्र मुलींनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक चित्र आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या देशभरात दोन कोटी एक लाखांवरून दोन कोटी सात लाखांवर गेली असताना महाराष्ट्रात मात्र त्यात १९ हजारांची घट झाली आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्रात २०१९-२० या वर्षांत एकूण १९ लाख ५१ हजार ६१० इतक्या मुलींनी विविध पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. २०२०-२१ मध्ये ही संख्या २० लाख ५४ हजार २५२ वर गेली. मात्र, २०२१-२२ मध्ये ही संख्या १९,२४० ने कमी होऊन २० लाख ३५ हजार १२ इतकी नोंदली गेली आहे. तुलनेत मुलांची संख्या वाढल्याचे दिसून येते. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांचा विचार करता ती अनुक्रमे २३ लाख १३ हजार ८६२, २४ लाख ९१ हजार ८९७ आणि २५ लाख ४२ हजार ८३१ अशी वाढलेली दिसून येते. भारतातील गेल्या सात वर्षांतील नोंदणीचा विचार करता मुलींच्या नोंदणीत ३२ टक्के (५० लाख) वाढ नोंदली गेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुलींच्या नोंदणीत झालेली घट चिंताजनक आहे.
विज्ञान शाखेत मुली अधिक
अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण अहवालानुसार २०२१-२२ मध्ये एकूण २ कोटी ६ लाख ९१ हजार ७९२ विद्यार्थिनींची नोंदणी झाली. पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. आणि एम. फिल. स्तरावरील प्रवेशांचा विचार करता ५७.२ लाख विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. यात महिला विद्यार्थ्यांची (२९.८ लाख) संख्या अधिक आहे. ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे.
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीत ४३% वाढ
- अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीत ६५% वाढ
२०१४-१५ मधील नोंदणी : ४६ लाख विद्यार्थी
२०२०-२१ मध्ये ती ६६ लाख २३ हजार झाली.
विद्यार्थिनींची नोंद ५१ टक्क्यांनी वाढली.
२०१४-१५ मधील नोंदणी : १६.४१ लाख
२०२१-२२मध्ये २७ लाख नोंदणी
विद्यार्थिनींची नोंद ८० टक्के वाढली.
सरकारी विद्यापीठांचा वाटा मोठा
विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी (७३.७ टक्के) सरकारी विद्यापीठांमध्ये आहे; तर खासगी विद्यापीठांचा वाटा २६.३ टक्के इतका आहे