लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाकडून विविध परीक्षांमध्ये यंदाही मुलींचेच वर्चस्व राहिले असून या स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या १८ विद्यार्थ्यांमध्ये १५ मुलींचा समावेश आहे. या १८ विद्यार्थ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात यंदा मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागातील गौरी कुलकर्णी या विद्यार्थिनीने कुलपती पदकावर आपली मोहर उमटवली.
विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात या पारितोषिकांचे वितरण झाले. यामध्ये सुप्रिया निकम (कल्पना अगरवाल स्मृती सुवर्णपदक आणि सुधा दवे सुवर्णपदक), रामाकृष्ण विद्या (एम. बी. कुकीयन सुवर्णपदक), ओंकार तोंडलेकर (वृंदा प्रभू सुवर्णपदक), निधी पाठक (एन्वायरोकेअर सुरेश आर. अमृतकर सुवर्णपदक), श्रेया मिश्रा (डॉ. रिटा घर्डे स्मृती सुवर्णपदक), अंजली जादोन (दि. श्री रंजनकुमार एच. वैद्य सुवर्णपदक), रेशम शर्मा (एन. एम. वाडिया सुवर्णपदक, दिवंगत कानुभाई एम. पटेल सुवर्णपदक), जान्हवी जैन (रघुनाथ जहागिरदार सुवर्णपदक) मिळाले. तर विपुल वैभव याला दिवंगत कमलाबाई रुपराव येंदे आणि दिवंगत रुपराव शंकरराव येंदे सुवर्णपदक, अस्मा शेख हिला डॉ. रफिक झकारिया सुवर्णपदक, वंशिका शोरवाल हिला श्रीमती विमलाबाई गरवारे सुवर्णपदक, आकांक्षा यादव हिला श्रीमती विमलाबाई गरवारे सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.