मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील वसतिगृहामध्ये गैरसोय असून, दूषित पाणी, निकृष्ट अन्नामुळेच मुलींची तब्बेत खालावली, अशी कबुलीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असा त्रास होत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी उद्धवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी प्रश्न मांडला. कलिना संकुलात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन महिला वसतिगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
झाडेझुडपे वाढल्याने साप वगैरे येतात. आपत्कालीन परिस्थितीत आवारात एकही रुग्णवाहिका नाही, याकडेही पोतनीस यांनी लक्ष वेधले.त्यावर मंत्री पाटील म्हणाले, कलिना संकुलात असलेल्या तीन वसतिगृहांची एकूण क्षमता १४४ आहे. २०२३-२४ मध्ये १३७ जणांनी प्रवेश घेतला आहे. एप्रिलमध्ये अचानक काही मुलींना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या प्रकरणी चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येक मुलीची वैयक्तिक भेट घेऊन विचारपूस केली. परंतु, या वसतिगृहात निकृष्ट अन्न आणि दूषित पाणी नाही हे आम्ही अमान्य करत नाही; परंतु हा त्रास नव्याने मुंबईत आलेल्या मुलींना झाला होता.
ज्या तीन वसतिगृहांबाबत तुम्ही सांगत आहात तिथे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून, दिवसा साप आढळतात. तेथे टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ते पाणी कुठून भरून आणतात ते तुम्हाला दाखवतो. दूषित पाणी आणि निकृष्ट दर्जाचे अन्न यामुळे मुलींची तब्बेत बिघडली आहे. त्यामुळे याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी परब यांनी केली.