राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; मंगल प्रभात लोढा यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:21 PM2023-06-21T18:21:18+5:302023-06-21T18:23:13+5:30
युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमाचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
लोढा पुढे म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे लोढा यावेळी म्हणाले.
आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.