Join us

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; मंगल प्रभात लोढा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 6:21 PM

युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. 

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमाचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. 

लोढा पुढे म्हणाले, अलीकडील काळात महिला व मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. याला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खुपच आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे लोढा यावेळी म्हणाले.

आयुक्त, महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापिठांच्या मदतीने स्वसंरक्षण शिबीरांचे आयोजन करण्यासाठी  नियोजन करण्यात आलेले आहे. युवतींचे मनोबल उंचविण्यासाठी तीन दिवस समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी सांगितले. 

टॅग्स :महिलामंगलप्रभात लोढा