नवी मुंबई : नेरुळ पोलिसांनी आग्रा येथील कुंटणखान्यावर छापा टाकून देशभरातील २१ मुलींची सुटका केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलींचा समावेश असून या मुलींची दोन ते पाच लाख रुपयांना कुं टणखाना मालकांना विक्री करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे.आग्रा येथील कश्मिरी बाजार या वेश्या वस्तीतील कुंटणखान्यात महाराष्ट्रातील अनेक मुली असल्याची माहिती एका पीडित मुलीने नेरुळ पोलिसांना दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी ही माहिती आयुक्त प्रभात रंजन, उपआयुक्त शहाजी उमाप, उपआयुक्त सुरेश मेंगडे यांना सांगताच त्यांनीही गांभीर्य लक्षात घेत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार १६ जणांचे पथकाने पीडित महिलेच्या माहितीवरून आग्रा येथे जाऊन संबंधित कुंटणखान्यावर छापा टाकला. यात काही मुलींची सुटका केल्यानंतर त्यांच्याकडून इतर ठिकाणांचीही माहिती मिळाली. त्यानुसार आठ कुंटणखान्यावर कारवाई करून एकूण २१ मुलींची सुटका करण्यात आली. मात्र पोलिसांची ही कारवाई सुरू असताना कुंटणखानाचालकांनी त्यांना प्रतिकार करत जमिनीत बनवलेल्या विशेष खड्ड्यात मुलींना लपवून ठेवले होते. पूजा उर्फ परविन खान (३२), श्रीमान तामन (५२), जेन वीरबहादूर (२५) व सुभाष उर्फ पप्पू बाबूलाल (३८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका दाम्पत्याने मुलींना फसवून वेश्याव्यवसायासाठी कश्मिरी बाजारात विकल्याची माुहिती पोलीसांना मिळाली आहे. सुटका केलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ५ मुली तर १६ इतर राज्यांमधील असल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. दोन मुली पुण्याच्या असून कल्याण, लातूर, उस्मानाबादची प्रत्येकी एक मुलगी असल्याचेही उमाप यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील मुलींची आग्य्रातून सुटका
By admin | Published: August 05, 2015 1:16 AM