‘त्या’ मुलीला गर्भपातास न्यायालयाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 05:54 AM2018-09-16T05:54:16+5:302018-09-16T05:54:59+5:30
बलात्कार, कॅन्सरपीडित अल्पवयीन २४ आठवड्यांची गर्भवती
मुंबई : बलात्कार व कॅन्सरपीडित अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली. ही पीडिता २४ आठवड्यांची गर्भवती आहे. न्या. अभय ओक व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने मुलीला शनिवारी जे. जे. रुग्णालयात जाण्याचे निर्देश दिले व जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना मुलीचा गर्भपात तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करण्याचे निर्देश दिले.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुलीच्या गर्भपातासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेनुसार, मुलीवर बलात्कार झाला व यासंदर्भात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. मुलगी कॅन्सरग्रस्त असल्याने तिला केमोथेरपीसाठी स्थानिक रुग्णालयात नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले.
मुलीला २०१० पासून ब्लड कॅन्सर आहे. तिचे वडील मजूर आहेत आणि आई घरकाम करते. मुलगी गर्भवती असल्याने तिच्या पालकांनी एनजीओमध्ये धाव घेतली. या एनजीओने मुलीच्या पालकांची अॅड. कुलदीप निकम यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर अॅड. निकम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
याआधीच्या सुनावणीत न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला तज्ज्ञ डॉक्टरांचे पॅनेल नियुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यात एका मनोविकार तज्ज्ञाचाही समावेश करण्यास सांगितले. या पॅनेलला मुलीची वैद्यकीय चाचणी करून तिचा गर्भपात केला जाऊ शकतो का, याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जे. जे. रुग्णालयाने मुलीचा गर्भपात करणे शक्य असल्याचे अहवालात म्हटल्यावर न्यायालयाने मुलीचा गर्भपाताची परवानगी देत याचिका निकाली काढली.
दरम्यान, न्यायालयाने मुलीच्या पालकांना महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. प्राधिकरणाकडून आर्थिक व विधि साहाय्य मागावे व मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिला शिकविण्याचा सल्ला दिला.
...त्या घटनेनंतर शाळेत जाणे सोडून दिले
अशाच स्वरूपाच्या एका केसमध्ये प्राधिकरणाने आणि बार असोसिएशनच्या काही सदस्यांनी अल्पवयीन बलात्कार पीडितेला पुढील शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केल्याचे न्या. ओक यांनी सांगितले.
याआधी पीडिता शाळेत जात होती. मात्र, बलात्काराच्या घटनेनंतर तिने शाळेत जाणे सोडले, असे न्यायालयाला सांगितले.