आईने मोबाइलवर खेळण्यास विरोध केल्याने मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 03:05 AM2019-02-14T03:05:56+5:302019-02-14T03:06:41+5:30
अभ्यास न करता सतत मोबाइलवर खेळत असल्याने आई ओरडली. याच रागात मुलीने घर सोडले. त्यानंतर, तिचा शोध घेत, तिला घरीही आणले. मात्र, रागाने तिने स्वत:ला खोलीत कोंडून गळफास घेतल्याची घटना वाकोलामध्ये मंगळवारी घडली.
मुंबई : अभ्यास न करता सतत मोबाइलवर खेळत असल्याने आई ओरडली. याच रागात मुलीने घर सोडले. त्यानंतर, तिचा शोध घेत, तिला घरीही आणले. मात्र, रागाने तिने स्वत:ला खोलीत कोंडून गळफास घेतल्याची घटना वाकोलामध्ये मंगळवारी घडली.
वाकोला येथील रावळपाडा परिसरात १२ वर्षीय अक्षिता बालवणकर ही आईवडील, भावंडासह राहायची. तेथीलच शाळेत ती सातवी इयत्तेत शिकत होती. सोमवारी अभ्यास न करता, ती मोबाइलमध्ये भावंडासह खेळत होती. सतत मोबाइलवर खेळत असल्याने आई तिला ओरडली आणि अभ्यास करण्यास सांगून मोबाइल काढून घेतला. याच रागात ती कुणलाच काहीही न सांगता संध्याकाळी घरातून निघून गेली.
बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिराने ती सापडली. घर सोडून गेली, म्हणून तिला आणखी ओरडा बसला. त्यानंतर, मंगळवारी सकाळी ती शाळेत गेली नाही. खोलीतच बसून राहिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळफास घेत तिने आत्महत्या केली.
बराच वेळ झाला, तरी अक्षिताचा काहीच प्रतिसाद न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला, तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
मोबाइल खेळण्यास विरोध केला, म्हणून तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याची माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलासचंद्र आव्हाड यांनी दिली.