तृतीय वर्ष बी कॉम सत्र सहाच्या निकालात मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 06:23 AM2019-05-27T06:23:33+5:302019-05-27T06:23:43+5:30

मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ या परीक्षेचा शनिवारी उशिरा निकाल जाहीर केला आहे.

Girls win the third year B.Com session | तृतीय वर्ष बी कॉम सत्र सहाच्या निकालात मुलींची बाजी

तृतीय वर्ष बी कॉम सत्र सहाच्या निकालात मुलींची बाजी

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०१९ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ६ या परीक्षेचा शनिवारी उशिरा निकाल जाहीर केला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारली असून या परीक्षेत २३,६७८ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६८.७६ % एवढे आहे.
बी.कॉम सत्र ६ साठी ५१,२६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५०,७०८ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेस बसले होते. त्यापैकी २३,६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ६०.३१ % एवढी आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १४,९६९ मुली असून ८,७०९ मुले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६८.७६ % एवढे आहे. तर या परीक्षेत १५,५८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून ७९ कॉपी प्रकरणे आढळली आहेत.
विशेष म्हणजे विद्यापीठाने हा निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे. २०१८ मध्ये विद्यापीठाने हा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला होता.
>‘त्या’ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. कारण हे विद्यार्थी प्रथम किंवा द्वितीय किंवा तृतीय वर्षातील सत्र ५ ची परीक्षा अनुत्तीर्ण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण झाल्याचे निकाल प्राप्त झाल्यास तसेच बी.कॉम सत्र ५ चा निकाल जाहीर झाल्यास या विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रित जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच काही विद्यार्थी जुन्या सीबीएसजीएस म्हणजेच क्रेडिट बेस ग्रेडिंग या आकृतिबंधातून प्रथम व द्वितीय वर्ष उत्तीर्ण होऊन नवीन सीबीसीएस म्हणजेच चॉइस बेस क्रेडिट या नवीन आकृतिबंधात तृतीय वर्षाची परीक्षा दिली आहे. त्यांना समकक्षता देण्याचे कार्य सुरू असून त्याचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
>२,२२,६३८ उत्तरपत्रिकांसाठी ३,७०७ शिक्षक
तृतीय वर्ष बी.कॉमच्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी २,२२,६३८ इतक्या उत्तरपत्रिका होत्या. त्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी ३,७०७ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तर ५७,१०८ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन आॅनस्क्रीन मार्किंग (ओएसएम) पद्धतीने झाले आहे.
>बी.कॉम सत्र ६ चा निकाल हा मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच हा निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाले.
- डॉ. सुहास पेडणेकर,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
बी.कॉमच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तृतीय वर्षाचा निकाल अचूक, निर्दोष व वेळेत लावण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
- डॉ. विनोद पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Web Title: Girls win the third year B.Com session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.