बोरिवलीतील गीतांजली बिल्डिंग अवघ्या काही सेकंदांत जमीनदोस्त; सुदैवाने जीवितहानी नाही
By मनोहर कुंभेजकर | Published: August 19, 2022 06:52 PM2022-08-19T18:52:34+5:302022-08-19T18:57:10+5:30
आज सकाळी 10.30च्या सुमारास येथील नागरिकांना हादरे जाणवले यानंतर नागरिक तत्काळ इमारतीतून बाहेर पडले यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बोरिवली, साईबाबा नगर येथील गीतांजली बिल्डिंग अवघ्या काही सेकंदांत जमीनदोस्त झाली. मुंबई महानगर पालिकेने या सोसायटीतील 4 विंग धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. परंतू कोर्टात सुनावणीची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांचे स्थलांतर झाले नाही. आज सकाळी 10.30च्या सुमारास येथील नागरिकांना हादरे जाणवले यानंतर नागरिक तत्काळ इमारतीतून बाहेर पडले यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या वेळी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या परिमंडळ 7 चे उपायुक्त, डॉ. भाग्यश्री कापसे तसेच आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती गोंधळी यांच्यासह या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि उरलेल्या 3 इमारतींमधील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
सणासुदीचे दिवस असतानादेखील या प्रसंगी खासकरून डी.सी.पी. विशाल ठाकूर, पोलीस प्रशासन, महापालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोचून मदतकार्य सुरु केले.