मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२ हजार शिष्यवृत्ती द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 03:27 AM2018-08-31T03:27:04+5:302018-08-31T03:28:04+5:30
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तातडीने अदा करण्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी
मुंबई : पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तातडीने अदा करण्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सरकारविरोधात गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ म्हणाले, राज्यभर हजारो एसटी, एससी, ओबीसी विद्यार्थ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची शिष्यवृत्ती प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात एससी वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शिष्यवृत्ती मिळाली आहे. मात्र इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शिष्यवृत्तीअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातील केंद्राबाहेर अभाविपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाºया २ हजार २५० रुपयांच्या शिष्यवृत्तीमध्ये १२ हजार रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी अभाविपने केली. राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही आजच्या निर्देशांकाप्रमाणे भत्त्यात वाढ द्यावी. सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना आणून शिष्यवृत्ती प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत, असे आवाहनही अभाविपने केले.