मुंबई : ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी उर्फ डीएसके याच्या परिवाराला पुण्यातील त्यांच्याच बंगल्यात राहायचे असल्यास दरमहा ११ लाख रुपये घरभाडे द्यावे लागेल, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने डीएसकेंना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
उच्च न्यायालयाने डीएसकेंना २२ आॅक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत दिली आहे. वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना फसविल्याप्रकरणी डीएसके सध्या तुरुंगात आहेत. त्यांची सर्व संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यात त्याच्या बंगल्याचाही समावेश आहे. या बंगल्यात त्याचा सर्व परिवार राहत होता. ईडीने त्याचा बंगला ताब्यात घेण्यासंबंधी नोटीस काढल्यावर डीएसकेंनी संबंधित प्रशासनाकडे बंगला ताब्यात न घेण्यासंबंधी विनंती केली. मात्र, प्रशासनाने त्याची विनंती अमान्य केल्यावर त्यांनी दिल्लीतल्या अपिलेट अथॉरिटीकडे अपील केला. मात्र, अपिलेट अथॉरिटीने त्यांना बंगला भाड्याने घेण्याचा पर्याय सुचविला. त्यानुसार ईडीने डीएसकेंच्या पुण्यातील कीर्तिवाल येथील बंगल्याचे बाजारभावाप्रमाणे दरमहा ११ लाख रुपये भाडे देण्यास सांगितले.
ईडीने सांगितल्याप्रमाणे डीएसकेंच्या पुण्यातील कीर्तिवाल येथील बंगल्याचे बाजारभावाप्रमाणे दरमहा ११ लाख रुपये भाडे द्यायचे होते. याबाबत डीएसकेंनी दहा दिवसांत ईडीला कळवायचे होते. ही मुदत २५ सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, काहीच न कळविल्याने ईडीने ३० सप्टेंबर रोजी डीएसकेंचा बंगला ताब्यात घेत त्याच्या परिवाराला बाहेर काढले. ईडीने सांगितलेले भाडे परवडणारे नाही. त्यांना दोन ते अडीच लाख रुपये भाडे आकारण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती डीएसकेंनी याचिकेत केली आहे.
बंगला भाड्याने देण्याची केली होती विनंती
‘दिल्लीच्या अपिलेट अथॉरिटीने दिलेल्या निर्णयाला आपण आव्हान देत नाही. केवळ सहानुभूती दाखवून हा बंगला दोन ते अडीच लाख रुपये भाड्याने द्यावा, ही विनंती करीत आहोत,’ असे डीएसकेंच्या वकिलांनी न्यायालयालासांगितले होते.