Join us

'मुंबईतील झोपडपट्टीधारकांना 300 चौफूटांचे घर द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 10:57 PM

आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: मुंबईतील झोपडपट्टीधारकांना 300 चौफूटांचे घर द्या अशी मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.मुंबईतील झोपडपट्टीधारकांना 269 चौफूटांऐवजी 300 चौफूटांचे घर द्या अशी मागणी मागील सरकारच्या काळात सतत 5 वर्षे विधानसभेत आपण लावून धरली होती. त्यानुसार उपरोक्त प्रस्तावावर गृहनिर्माण खात्याचे अप्पर मुख्य सचिव व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती आमदार प्रभू यांनी त्यांच्या पत्रात नमूद केली आहे.

सद्यस्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 269 चौफूट क्षेत्रफळांच्या अनेक झोपडपट्टी प्रकल्पांच्या प्रस्तावास मंजूरी देऊन इरादपत्र (एलओआय) देण्यात आले आहे.परंतू राज्य शासनातर्फे झोपडपट्टी धारकांना 300 चौफूटांचे घर देण्याचा  राज्य शासन निर्णय घेत असल्याने अनेक विकासकांची कामे प्रगतीपथावर आहेत.सद्यस्थितीत शासनाने 300 चौफूट देण्याच्या निर्णयास विलंब लावल्यास अनेक प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पातील 269 चौफूटांचे बांधकाम तोडून 300 चौफूट क्षेत्रफळांच्या घराची मागणी झोपडपट्टी धारक करतील.यामध्ये विकासकांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून सध्याच्या निधी टंचाईच्या परिस्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडण्याची शक्यता आमदार प्रभू यांनी व्यक्त केली.

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारने जाहिर केल्याप्रमाणे 300 चौफूटांच्या क्षेत्रफळांचे घर देण्याच्या गृहनिर्माण राज्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी प्रलंबित असंलेल्या सदर प्रस्तावास राज्य शासनाने त्वरित मंजुरी देऊन मुंबईतील झोपडपट्टीधारकांना 300 चौफूटांचे घर देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आमदार प्रभू यांनी शेवटी केली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेसुनील प्रभूशिवसेना