मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात समाज पुन्हा एकटवला आहे. मात्र, मराठा तरुण आत्महत्या करुन आरक्षणाची मागणी करत असल्याने सर्वच स्तरातून चिंता आणि काळजी व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील जगन्नाथ काळकुटे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली होती. त्यानंतर, आज नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यावर, मनोज जरांगे पाटील यांनी दु:ख व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त जगन्नाथ काळकुटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, पीडित कुटुंबाला एकटं पडू देणार नाही, सरकारच या घटनांना जबाबदार आहे, असे जरांग पाटील यांनी म्हटले. तसेच, काळकुटे कुटुंबीयांस शासनाने ५० लाख रुपयांची मदत द्यावी, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर असताना जालन्यातील एका मराठा युवकाने मुंबईत आत्महत्या करत मराठा आरक्षणासाठी जीवनं संपवल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातहीी २४ वर्षीय युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. 'एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलीदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जावु नये असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्याच्याजवळ आढळून आली आहे. शुभम सदाशिव पवार असे मयत तरुणाचे नाव आहे.
बीडमधील जगन्नाथ काळकुटे यांची आत्महत्या
जगन्नाथ काळकुटे यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या एका झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना समज देऊन घरी पाठवलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात पत्नी, आई आणि दोन मुलं असा परिवार आहे. बीडमधील जगन्नाथ काळकुटे यांचा मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे जगन्नाथ काळकुटे यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा शब्द जरांगे पाटलांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिला आहे.