निवडणुकीसाठी ६०० बस द्या! बेस्ट उपक्रमाकडे आयोगाची मागणी; अपुऱ्या बसमुळे प्रवाशांची गैरसोय अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 01:03 PM2024-10-26T13:03:11+5:302024-10-26T13:05:42+5:30
बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार २११ बस आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगाने बेस्ट उपक्रमाकडे बसची मागणी केली आहे. सध्या मुंबई शहरातील या कर्मचाऱ्यांसाठी ६०० बस मागितल्या आहेत; मात्र उपनगरात बसची ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. दरम्यान, बेस्टकडून अद्याप या मागणीचा विचारच सुरू असला तरी निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणात बस उपलब्ध करून दिल्यास दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
बेस्टच्या ताफ्यात सध्या तीन हजार २११ बस आहेत. हा ताफा वाढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्यांत दोन हजार १०० बसगाड्या उपलब्ध होणार होत्या; मात्र कंत्राटदार कंपनीकडून केवळ २७० बसच उपलब्ध करण्यात आल्या, त्याबरोबरच बसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी, कमी बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, निवडणूक कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी निवडणूक आयोगाने ६०० बसगाड्यांची मागणी केली आहे.
या अगोदर मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह दिव्यांग उमेदवारांना मतदान केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी बेस्टच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेस्टकडून आता विधानसभेसाठी काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अधिकारी, कर्मचारी, पोलिसांसाठी बसचा वापर
- विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यापूर्वी संपूर्ण यंत्रणा स्थिर स्थावर केली जाणार आहे.
- मतदान केंद्रांपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांची ने-आण करणे, तसेच बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्टच्या बसचा वापर केला जाणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- निवडणूक आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व बस तातडीने पुन्हा बेस्टकडे सुपूर्द केल्या जातात. निवडणूक सेवेतील या बस सोबत बेस्टच्या चालकांचाही समावेश असतो.
- मात्र, कंडक्टरची गरज नसल्याने त्यांना या सेवेसाठी पाठवले जात नाही; दुसरीकडे निवडणुकीसाठी बससेवा पुरवल्याने मुंबईकरांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
- लोकसभा निवडणुकीत मे महिना असल्याने आणि बरेचसे प्रवासी शहराबाहेर असल्याने त्रास जाणवला नाही; यावेळी तो जाणवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.