मुंबई - एका कंपनीच्या प्रकरणात अनुकूल आदेश जारी करण्यासाठी रजिस्ट्रार ऑफ कंपनी विभागात कार्यरत एका उपायुक्ताने संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीकडे दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने त्याला अटक केली आहे. शंकर लांडा असे त्याचे नाव असून, तो मुंबईत कार्यरत आहे.
एका खासगी कंपनीचे प्रकरण तो हाताळत होता. त्याने कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी आणि त्यात अनुकूल आदेश जारी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. मात्र, एवढे पैसे देणे शक्य नसल्याचे कंपनीच्या प्रतिनिधीने त्याला कळविले. त्यानंतर ३५ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी लांडा याने दाखवली. दरम्यान, संबंधित कंपनीने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि त्याला लाच घेताना त्याला अटक केली.