मुंबई : समाजाच्या उभारणीमध्ये विविध प्रकारचे कामगार, कुशल कामगार, हस्तकला कारागीर, आदिवासी कलाकार हे निरपेक्षपणे योगदान देत असतात. हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहून आपापले काम करीत असतात. ‘लोकमत’सारख्या सर्वदूर विस्तार असलेल्या वृत्तपत्राने अशा अनाम कामगारांच्या कामाची दखल घेऊन त्यांनाही सन्मानित करावे जेणेकरून त्यांना काम करताना नवा हुरूप येईल, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. समाजातील विविध क्षेत्रांत चांगले काम करणाऱ्यांचा ‘लोकमत’ समूहाकडून नेहमीच सन्मान केला जातो. लोकमतची ही कामगिरी उल्लेखनीय आणि अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
राजभवनात लोकमतने आयोजित केलेल्या कल्याण-डोंबिवली गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, रिजेन्सी ग्रुपचे प्रमुख महेश अग्रवाल, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शुक्ला, वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान उपस्थित होते.
लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मनोगतात सांगितले की, राजभवनात सामान्य माणूस येत नाही. त्याला भीती वाटते. मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी ती भीती घालविण्याचे काम केले आहे. पूरपरिस्थिती, कोविडकाळात त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन प्रवास केला. इतकेच काय त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला, तेव्हा कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या राज्यपालांमधील संवेदनशील माणूस दिसून येतो.
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, कल्याण - डोंबिवली ही जुळी शहरे असून, कल्याणला मोठा इतिहास आहे. दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण येथे आढळला. आरोग्याच्या सोयीसुविधा पुरेशा नसताना महापालिकेने सामाजिक संस्था, आयएमए, खासगी डॉक्टरांना घेऊन कोरोनावर मात केली. आता शिवाजी महाराजांची कल्याण शहराशी असलेले नाते लक्षात घेऊन खाडीकिनारा विकसित करून नौदलाचे संग्रहालय उभारणार आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, लोकमतशी माझे चांगले नाते आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमांचा मी एक भाग झालो आहे. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन नीटनेटके असते. मराठी भाषेतील कोट्यवधी वाचकसंख्या असलेल्या लोकमतप्रमाणे आपण त्या त्या स्थानिक भाषांचा आग्रह धरला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. इतकेच नव्हे तर कार्यक्रमात महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करीत असताना मराठीत बोला, असा आग्रह राज्यपालांनी धरला.