रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत अहवाल द्या - राज्यमंत्री योगेश कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:28 IST2025-04-10T15:27:47+5:302025-04-10T15:28:14+5:30

मुंबई : कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा ...

Give a report on the works on Devarhati land in Ratnagiri and Sindhudurg districts says Minister of State Yogesh Kadam | रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत अहवाल द्या - राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत अहवाल द्या - राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : कोकणातील रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश बुधवारी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

या जमिनींच्या जवळ पारंपरिक जुनी मंदिरे व धार्मिक स्थळे असून, त्यावर विविध विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, या जमिनींवर विकासकामे करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. परिणामी, विविध मूलभूत सुविधा व धार्मिक-सामाजिक कामांचे प्रस्ताव रखडलेले आहेत. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तातडीने या जमिनींबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.

रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील प्रलंबित कामांचा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा मंत्रालयात घेण्यात आला.

या जमिनींच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर १९९६ च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांचा संदर्भ घेत, देवरहाटी जमिनीवर विकासकामांसाठी पुढील कार्यवाही निश्चित करावी. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक मंदिरे, सभागृह, अंगणवाड्या, शाळा, स्वच्छतागृहे यासारखी अनेक मूलभूत कामे वन विभागाच्या परवानगीअभावी रखडलेली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती व प्रशासनाकडून या कामांसाठी वेळोवेळी प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यावर जलद गतीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे कदम यांनी बैठकीत सांगितले.

देवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न संवेदनशील असला तरी न्यायालयीन निर्णय, कायदेशीर बाबी व स्थानिक जनतेच्या भावना यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस दूर संवाद प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, विभागीय वन अधिकारी चिपळूण, उपवन संरक्षक सावंतवाडी, तर मंत्रालयात महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Give a report on the works on Devarhati land in Ratnagiri and Sindhudurg districts says Minister of State Yogesh Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.