मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेमार्ग पाण्याखाली जाऊन मध्य रेल्वेची सेवा ठप्प होते. यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत असते. मात्र रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती व आवश्यक मदत मुंबईकरांना तातडीने मिळणे गरजेचे असते. त्यामुळे या कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मध्य रेल्वे, पोलीस, बेस्ट, हवामान खाते यांची विशेष बैठक बोलावली होती. त्यानुसार अतिवृष्टीच्या काळात पालिका, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रेल्वे यांना सतर्क होण्यासाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा किमान २४ तास आधी द्यावा, असे निर्देश हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांना या बैठकीत देण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नाले आणि रेल्वे मार्गावरील कल्व्हर्ट साफ करण्यात येतात. तरीही पावसाळ्यात पाणी तुंबून रेल्वे सेवा विस्कळीत होत असते. पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा आयुक्तांनी शुक्रवारी घेतला. या वेळी पावसाळ्याच्या काळात होणाऱ्या विलंबाबद्दल रेल्वेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला नियमितपणे तातडीने माहिती देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पूर्वकल्पना मिळाल्यास गरजेनुसार बेस्ट उपक्रम जादा बसगाड्यांची सोय स्थानकाबाहेर करू शकेल.
वाहतूक अधिक काळासाठी ठप्प झाल्यास पालिकेच्या निवारा केंद्रांत प्रवाशांना हलविणे, त्यासाठी प्रवाशांकडून नाममात्र पाच रुपये भाडे घेऊन त्यांना पालिकेच्या निवारा केंद्रात हलवावे, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. अनेक ठिकाणी या पर्जन्य जलवाहिन्या रेल्वेमार्गाखालून जातात. पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा, यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना गेल्या काही वर्षांपासून रेल्वे हद्दीत सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी तत्काळ करून घेण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात राहावे. रेल्वे ट्रॅकखालील कल्व्हर्टस, नालेसफाई, नाले रुंदीकरण यांसारख्या कामासाठी पालिकेकडून रेल्वेला देय असलेला निधी तातडीने दिला जाईल, याची खात्री करून घ्यावी. शिवाय या कामाची वेळोवेळी पाहणी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने करता येऊ शकेल का? याची शक्यता पडताळून पाहावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.‘उपनगरातील डॉप्लर कार्यरत करा’सध्या कुलाबा येथे एक डॉप्लर रडार कार्यरत आहे. वेरावली, अंधेरी येथे दुसºया डॉप्लर रडारसाठी हवामान खात्याला यापूर्वीच महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हे दुसरे डॉप्लर रडार कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित करावे, असेही निर्देश हवामान खात्याला देण्यात आले. हवामानाबद्दलचा अंदाज जास्तीतजास्त अचूक मिळावा यासाठी आपली यंत्रणा आणखी अद्ययावत करावी, असेही हवामान खात्याला बजावण्यात आले आहे.पावसाळापूर्व तयारीसाठी विशेष ‘वेब पेज’ची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये पावसाळ्याच्या निमित्ताने करण्यात येणारी कामे, सद्य:स्थिती आणि संबंधित यंत्रणा यांची माहिती या ‘वेब पेज’वर असावी, असे आदेश मुख्य विश्लेषक अधिकारी यांना देण्यात आले आहेत.रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना मदत व्हावी, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था अन्न व तत्सम गरजेच्या वस्तूंचे वाटप करीत असतात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व संचालक माहिती तंत्रज्ञान यांनी या स्वयंसेवी संस्थांची माहिती अद्ययावत करून ती रेल्वे प्रशासनालाही उपलब्ध करून द्यावी.