टाटा म्हणाले, भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न द्या; असा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत असला तरी रतन टाटा यांनी हे कॅॅम्पेन थांबविण्यात यावे, अशी विनंती करून पुन्हा एकदा आपल्या साधेपणाचा प्रत्यय दिला.
रतन टाटा यांनी कोरोना काळात दीड हजार कोटींची मदत केली होती. सातत्याने करत असलेल्या समाजसेवेमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. विशेषत: त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नागरिकांना भावते. रतन टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता त्यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.
मोटिव्हेशन स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम ही मागणी केली होती. ही मागणी होताच रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा, असा हॅशटॅग ट्रेंड झाला. अनेकांनी यात सहभाग घेतला. हा हॅशटॅग वापरला.
मात्र हॅशटॅग सुरू असतानाच रतन टाटा यांनी शनिवारी आपले म्हणणे मांडले. सर्वप्रथम त्यांनी नागरिकांचे आभार मानले. ‘मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखविलेल्या भावनांचा मी आदर करतो. मात्र माझी विनंती आहे की, आपण ही मोहीम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहीन’, अशा आशयाच्या ट्विटने ही मोहीम थांबविण्यात यावी, असे म्हणणे त्यांनी मांडले.