राज्यपालांच्या कार्यालयाला एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या - ग्राहक मंच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:51 AM2018-09-02T03:51:00+5:302018-09-02T03:51:13+5:30
निकृष्ट दर्जाचे काचसामान राज्यपालांच्या कार्यालयाला पुरविल्याबद्दल, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने टाटा सिरॅमिक्स कंपनी व या कंपनीचे वितरक ईस्ट कोस्ट ग्लोबल प्रा. लि. यांना एक लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्यपाल कार्यालयाला देण्याचा आदेश दिला.
मुंबई : निकृष्ट दर्जाचे काचसामान राज्यपालांच्या कार्यालयाला पुरविल्याबद्दल, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने टाटा सिरॅमिक्स कंपनी व या कंपनीचे वितरक ईस्ट कोस्ट ग्लोबल प्रा. लि. यांना एक लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्यपाल कार्यालयाला देण्याचा आदेश दिला. काचसामान १५ दिवसांत बदलून देण्याचे किंवा काचसामानाची किंमत ५,८६, ६५५ परत करण्याचा आदेशही कंपनीला दिला.
राजभवनात विशेष अतिथी येत असल्याने येथे काचसामानाची आवश्यकता भासते. मार्च, २०१० मध्ये राज्यपालांच्या कार्यालयातून ईस्ट कोस्ट ग्लोबल प्रा. लि. कंपनीकडून काही काचसामान मागविले. ही कंपनी टाटा सिरॅमिक्स कंपनीच्या उत्पादकांची अधिकृत वितरक असल्याने, कंपनीलाच ५,८६, ६५५ किमतीच्या काचसामानाची आॅर्डर दिली. काचसामानांवर अशोकचक्र प्लॅटिनममध्ये अंकित करण्याची परवानगी दिल्याचे ग्राहक मंचापुढे केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
कंपनीने आॅर्डरप्रमाणे १६ मे, २०११ रोजी कार्यालयात काचसामान पोहोचविले. दोनदा ते धुतल्यानंतर त्यावरील प्लॅटिनम रिंग व डिझाइनचे बारीक तुकडे पडू लागले. टाटा सिरॅमिक्सला कळविल्यावर कंपनीने वितरकासोबतचा करार मार्च २०११ ला संपल्याचे व या वस्तू आपल्याकडून न घेतल्याचे राज्यपाल कार्यालयाला सांगितले. याबाबत ‘ईस्ट कोस्ट ग्लोबल’ने उत्तर न दिल्याने, राज्यपाल कार्यालय ग्राहक मंचात गेले.
सामानावर टाटा सिरॅमिक्सचा लोगो असल्याचे तक्रारदार म्हणाले. ‘महागड्या वस्तू घेताना त्यांचा दर्जा, गुणवत्तेबाबत ‘इम्प्लॉइड वॉरंटी’ असते. ती नसल्यास कोणीही त्या घेणार नाही. इतक्या महाग वस्तू दोन धुण्यात खराब होणे अपेक्षित नाही,’ असे निरीक्षण मंचाने नोंदविले.
‘कार्यवाही करणे अपेक्षित होते’
टाटा सिरॅमिक्सचा लोगो काचसामानावर आहे. संबंधित काचसामान आपण पुरविले नाही, असा ‘टाटा सिरॅमिक्स’चा दावा असेल, तर त्यांनी त्यांचे ख्यातिमूल्य जपण्यासाठी वितरक कंपनीवर कार्यवाही करणे अपेक्षित होते. तसेही त्यांनी केले नाही. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तक्रारदाराला निकृष्ट दर्जाचे सामान पुरविल्याचे म्हणत, मंचाने नुकसान भरपाईचा आदेश दिला.