एल्गार परिषद प्रकरण : विशेष न्यायालयाचे एनआयएला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा प्रकरणी आरोपी असलेल्या सुधा भारद्वाज यांना साक्षीदारांच्या जबाबांच्या प्रती देण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने एनआयएला दिले.
साक्षीदारांचे नाव आणि पत्ते वगळता सर्व माहिती द्या, असे निर्देश विशेष एनआयए न्यायालयाने दिले. साक्षीदारांच्या जबाबांच्या प्रती मिळाव्यात यासाठी भारद्वाज यांनी न्यायालयात अर्ज केला.
आधी दिलेल्या जबाबांच्या प्रतींमध्ये काहीच अर्थ नव्हता. कारण त्यातील महत्त्वाचा भाग वगळला होता. अशा प्रती देऊन आपल्या घटनात्मक अधिकारावर गदा आणल्याचा दावा भारद्वाज यांनी याचिकेद्वारे केला आहे.
न्या. डी. ई. कोथळीकर यांनी भारद्वाज यांचा अर्ज मंजूर करताना एनआयएला यापुढे साक्षीदारांचे जबाब देताना नीट काळजी घेण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाने स्टॅन स्वामी आणि अन्य आरोपींनी इलेक्ट्रॉनिक डाटाची क्लोन कॉपी देण्याबाबत केलेल्या अर्जावरही निर्णय दिला. एनआयएच्या कार्यालयातून क्लोन कॉपी घेण्याचे निर्देश आरोपींच्या वकिलांना दिले.
दरम्यान, भारद्वाज, गौतम नवलखा आणि हनी बाबू यांनी त्यांना दरमहा पाच पुस्तके आणि दररोज वाचण्यासाठी वर्तमानपत्र मिळावे, यासाठीही न्यायालयात अर्ज केला. कारागृहाच्या वाचनालयात पुरेशी पुस्तके नसल्याने आपले मित्र व वकील पाठवत असलेली पुस्तके कारागृह प्रशासन देत नसल्याचा आरोप या सर्वांनी केला आहे. संपूर्ण आयुष्य वाचण्यात आणि लिहिण्यात घालविल्याने कारागृह प्रशासन आपल्याला पुस्तके वाचण्यास मनाई करू शकत नाही, असे आरोपींनी अर्जात म्हटले आहे.
या अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना कारागृह प्रशासन पुस्तके देण्यास नकार देत असल्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
.................................