दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 08:14 PM2019-07-29T20:14:26+5:302019-07-29T20:14:52+5:30
दहीहंडी उत्सव याबाबत आज मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली.
मुंबई: दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या मंडळांना व आयोजकांना सुलभतेने द्या, असे निर्देश क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात दिले. दहीहंडी उत्सव याबाबत आज मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली.
पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांचा 10 लाखांपर्यंत विमा उतरवण्यात यावा, ध्वनी प्रदूषण होऊ नये, तसेच गोविंदाच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, मँट याचा वापर करण्यात यावा उत्सव स्थळी ॲम्बुलन्स उपलब्ध असावीत, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत. या अटींचे पालन करून आयोजक आणि गोविंदा पथक यांना परवानग्या सुलभतेने देण्यात याव्यात, अशी भूमिका दहीहंडी समन्वय समितीने या बैठकीत मांडली.
समन्वय समितीने मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करुन परवानगी देताना शासकीय यंत्रणेने त्यामध्ये सुलभता आणावी, असे निर्देश आशिष शेलार यांनी दिले. तसेच, गोविंदा पथकांचा विमा, तसेच वाहतूक नियंत्रणाचा प्लॅन याबाबतही पोलिसांनी दक्षता घ्यावी. दहिहंडी हा साहसी क्रीडा प्रकार म्हणून खेळला जावा तसेच त्याचा प्रसार व्हावा यासाठी ही समन्वय समातीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही आशिष शेलार यांनी केले.
या बैठकीला विशेष महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था मिलिंद भारांबे, कायदा सुव्यवस्था सह आयुक्त मनोजकुमार चौबे, प्रसंचालक सांस्कृतिक कार्य मिनल जोगळेकर, यांच्या सह दहिहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, सुरेंद्र पांचाळ, समिर सावंत, गिता झगडे, अभिषेक सुर्वे, डेव्हिड फर्नाडिस, समिर पेंढारे, अरुण पाटील आदी उपस्थित होते.