मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या नागरिकांना मासिक पास दिले जात आहेत. मात्र, रोज किंवा नैमित्तिक प्रवास करणाऱ्या नागरिकांची अडचण कायम आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना दैनिक तिकीट वितरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मंगळवारी केली.पक्षाच्या मुंबई कार्यालयात पत्रकार परिषदेत भाई जगताप म्हणाले की, लसीकरण झालेल्या नागरिकांना तिकीट काढून दैनंदिन प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे घरेलू कामगार, तसेच रोजंदारीवर काम करणारे कामगार, ज्यांना दैनंदिन तिकीट काढून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो, त्यांची यामुळे कुचंबणा होते. त्यांना बस, रिक्षा करून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तरी दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना दैनंदिन लोकल तिकीट प्रवास तिकीट काढून रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मुंबई काँग्रेसची मागणी आहे. या मागणीचे पत्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचेही जगताप म्हणाले.
- जगभरात तिसऱ्या लाटेचा धोका घोंघावत आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकार लसीकरणाबाबत उदासीन असल्याचा आरोपही भाई जगताप यांनी केला.