मुंबई : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या मुंबई रेल्वे साहाय्यक पोलीस उप- निरीक्षक सुरेश हातणकर यांची संपूर्ण कार्यालयीन माहिती सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.
कोविड - १९ च्या कर्तव्यावर असताना हातणकर यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ६५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईची रक्कम आपल्यालाही मिळावी, यासाठी हातणकर यांच्या दुसºया पत्नीने व तिच्या मुलीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. जे. काथावाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होती.दोघी जणी हातणकर यांची पत्नी असल्याचा दावा करीत आहेत. दुसºया पत्नीने व तिच्या मुलीने आपल्याला बेघर होण्यापासून व उपाशी राहण्यापासून वाचविण्याकरिता आपल्यालाही नुकसानभरपाईच्या रकमेतील वाटा मिळावा, अशी विनंती न्यायालयाला केली.शुक्रवारच्या सुनावणीत हातणकर यांच्या पहिल्या पत्नीने व तिच्या मुलीने आपल्या वडिलांच्या दुसºया विवाहाविषयी माहिती नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तर याचिकाकर्तीने (दुसरी पत्नी) दोन्ही मुलींची फेसबुकद्वारे एकमेकांशी ओळख असल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही पक्ष प्रामाणिकपणे माहिती देत नसल्याचे म्हणत न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या वकिलांना त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे निर्देश दिले. तसेच हातणकर यांची सर्व कार्यालयीन कागदपत्रेही सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्याशिवाय या प्रकरणावर प्रत्यक्षात सुनावणी घेण्यासाठी मुख्य न्यायाधीशांना विनंती करावी, अशी सूचना न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली.‘हक्क पहिल्या पत्नीचाच’एखाद्या पुरुषाला दोन बायका असल्या आणि दोघींनीही त्याच्या पैशावर हक्क सांगितला तर कायद्यानुसार तसा दावा केवळ पहिली पत्नीच करू शकते़ दोन्ही पत्नींच्या मुलांना त्यांच्या वडिलांचे पैसे मिळू शकतात, असे न्यायालयाने गेल्या सुनावणीत म्हटले होते.