दर महिन्याला तीन कोटी लसींचे डोस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:55+5:302021-09-21T04:06:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी राज्याने केंद्राकडे दर महिन्याला तीन कोटी लसींचे डोस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी राज्याने केंद्राकडे दर महिन्याला तीन कोटी लसींचे डोस देण्याची मागणी केली आहे. राज्यात आतापर्यंत दोन कोटी लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
सप्टेंबर महिन्याकरिता केंद्राने राज्याला १.७० कोटी लसींचे डोस मोफत कोट्यांतर्गत देऊ केले, तर खासगी कोट्यांतर्गत २२ लाख लसींचे डोस देण्यात आले. राज्याने या महिन्याकरिता आणखी एक कोटी डोस केंद्राकडे मागितले आहेत. राज्याकडे दिवसाला १५ लाख डोस देण्याची क्षमता असल्याने लसींच्या पुरवठ्याचे नियमन करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील १ कोटी ७६ लाख ४५ हजार ८५५ नागरिकांना दोन्ही डोस देत, देशात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाकडून लसी उपलब्ध होताच एका दिवसात ११ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही राज्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून राज्यातील ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला लस मात्रा देत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातील १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी ४८.६४ टक्के नागरिकांना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लोकसंख्येपैकी ३७.८८ टक्के नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या नागरिकांचे प्रमाण ५५.२४ टक्के एवढे आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ४५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि १८ ते ४४ वयोगटांतील नागरिक अशा एकूण ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला आतापर्यंत लस मात्रा देण्यात आल्या आहेत.