मुंबई : कोरोनाचा काळ आव्हानात्मक आहे मात्र या परिस्थितीत बेजबाबदार होणं किंवा त्याची भीती बाळगणे हा त्यावरचा उपाय नाही. या काळात एकमेकांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी कठीण काळात एकमेकांचा आधार व्हायला हवा, असा मोलाचा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. भीतीचा लॉकडाऊन होता कामा नये यासाठी खबरदारी घेऊन पाऊले टाकली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शनिवारी डॉ. शशांक जोशी व डॉ. राहुल पंडित यांनी युटयूब व्हिडीओच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, या काळात सर्वसामान्यांनी आपले छंद जोपासले पाहिजे, त्यात वेळ गुंतवून ठेवायला पाहिजे.मात्र मानसिकरित्या सुदृढ असणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेचा ताळमेळ याचा समतोल कसा राखला याविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व कठीण काळात आरोग्य यंत्रणांचीसोबत होती. त्यामुळे हा काळ अतिशय खंबीरपणे घालविण्यास सहाय्य मिळाले. प्रशासन, डॉक्टर व रुग्ण यांची सांगड घालण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. मुंबई आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांत साथीच्या रुग्णालयांसह विषाणूवर संशोधन करणारी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. प्लाज्मा ही सुद्धा जूनी उपचार पद्धती असून त्याचा अशा साथीच्या काळात अवलंब केला जातो, या उपचार पद्धतीवरही प्रयोग करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकमेकांना मानसिक आधार द्या - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 4:07 AM