शिक्षकांना शाळा-महाविद्यालयाच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे काम द्या; शिक्षक सेनेची मागणी
By रेश्मा शिवडेकर | Published: April 7, 2024 07:43 PM2024-04-07T19:43:40+5:302024-04-07T19:43:48+5:30
बदलापूरला राहणाऱ्या व मुलुंड भागात सेवेत असलेल्या शिक्षकांना दहिसर विधानसभेच्या निवडणुक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई: मुंबईतीलशिक्षकांना शाळा किंवा महाविद्यालय विधानसक्षा क्षेत्रामध्ये निवडणुकीची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केली आहे. शिक्षकांना ते ज्या विधानसभा क्षेत्रात काम करतात, त्या ठिकाणी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी न सोपविता लांबच्या विधानसभा क्षेत्रात कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षण आणि त्यानंतर पार पाडावयाच्या निवडणूक संबंधित कामाकरिता लांबचा प्रवास करावा लागतो आहे. प्रसंगी तीन तीन गाड्या बदलून ईस्पित स्थळ गाठावे लागते.
बदलापूरला राहणाऱ्या व मुलुंड भागात सेवेत असलेल्या शिक्षकांना दहिसर विधानसभेच्या निवडणुक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. असाच प्रकार पालघरला राहणाऱ्या एका शिक्षकाबाबत झाला आहे. त्यांची शाळा बोरीवलीत असताना त्यांना विक्रोळी भागातील निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. ही व्यवस्था अनेक शिक्षकांना त्रासदायक ठरत आहे. निवडणुकीचे काम करण्याकरिता त्यांना तीन ते साडेतीन तास अनेक गाड्या बदलून प्रवास करावा लागतो. शिक्षकांना होणाऱया या त्रासाचा विचार करून त्यांना निवडणुकीचे काम त्यांच्या शाळा-महाविद्यालयाजवळील विधानसभा क्षेत्रात देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केली आहे.