मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकर द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 05:52 PM2020-09-06T17:52:07+5:302020-09-06T17:52:35+5:30
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक व शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला नसल्याने...
मनोहर कुंभेजकर
मुंबई : महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी असून या मुंबईने आपल्या सारख्या साधा कार्यकर्त्याला नगरसेवक,आमदार व आता दोनदा खासदार म्हणून उत्तर मुंबईतील जनतेने भरघोस मतांनी लोकसभेत पाठवले. मराठी भाषिक संस्था, मराठी मतदारांचे अत्यंत प्रेम व आदर या मुंबईमुळेच आपल्याला मिळाले. महाराष्ट्राची मुख्य भाषा ही मराठी असून मराठी भाषेला अभिजात (प्राचीन भाषा) दर्जा देण्यासाठी आपण दि,६ फेब्रुवारी २०१७ पासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही यावर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक व शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला नसल्याने आपण पुन्हा एकदा मराठी भाषेला अभिजात (प्राचीन भाषा) दर्जा लवकर देण्याची आग्रही मागणी दि,3 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)प्रल्हाद सिंह पटेल व केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोख्रियल निशंक यांना सविस्तर पत्र लिहून केली आहे. उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
मराठी भाषेला अभिजात ('प्राचीन भाषेचा' ) दर्जा कधी देणार असा सवाल करत सदर निर्णय त्वरित घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा केली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर मंत्रालयाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करेल असे मत देखिल त्यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा (प्राचीन भाषा) देण्याचा मुद्दा दि, ६ फेब्रुवारी २०१७ लोकसभेत उपस्थित केला होता. तत्कालीन सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी तज्ज्ञ समितीसमोर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या चर्चेसाठी सादर केले होते. या समितीने मराठी भाषा प्राचीन असल्याचे पुष्टी करून केंद्र सरकारला संमती दिली होती.
दि,30 डिसेंबर 2019 व 4 जानेवारी 2020, आणि 7 फेब्रुवारी 2020 रोजी पुन्हा पुन्हा मराठी भाषेला अभिजात भाषा (प्राचीन भाषा) दर्जा देण्याच्या संदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. अखेरीस, मद्रास उच्च न्यायालयाच्या रिट याचिकेच्या निकालानंतर 23 मार्च 2018 रोजी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी या विषयाच्या संदर्भातील निकष, मार्गदर्शक सूचना आणि मंत्रालयाच्या प्रस्तावावर सक्रिय विचार करण्याच्या हेतूची पूर्तता याबाबत माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांना देण्यात आली.यानंतर आपण स्वतः थेट सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री यांची भेट घेतली अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.