आहारची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले की, हॉटेल आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. लॉकडाऊन काळात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे सरकारने आर्थिक मदत द्यावी. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाण्याची परवानगी देण्यासोबतच कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच एफ एल ३ परवाना आणि चालू वर्षाच्या शुल्कात कपात केली जावी, पालिकेचे परवाने, परवानग्या आणि एनओसी यांना वर्षभर मुदतवाढ द्यावी, लॉकडाऊन काळातील मालमत्ता कर माफ करावा, अशीही विनंती केली आहे.
* सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंटची अवस्था बिकट झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट वाचविण्यासाठी तातडीने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास हे क्षेत्र वाचविणेही कठीण होईल.
शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार संघटना
............................................