ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14- भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर अभिनेता सलमान खान याने वक्तव्य केलं आहे. जे युद्ध करण्याचे आदेश देतात त्यांच्याच हातात बंदूका द्या, असं सलमान खान म्हणाला आहे. वायरल बॉलिवूड या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमानने हे वक्तव्य केलं आहे.
जे युद्धाचे आदेश देतात, त्यांच्या हातात बंदूक दिली पाहिजे, असं केलं तर त्यांचे हात-पाय थरथरायला लागतील आणि युद्धाऐवजी त्यांची चर्चा सुरु होईल, असं सलमान म्हणाला आहे. सलमानच्या या वक्तव्याने आता एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
जेव्हा युद्ध होतं तेव्हा दोन्ही बाजूंचे जवान मारले जातात. जवानाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्यांना त्या व्यक्तीशिवाय संपूर्ण आय़ुष्य घालवावं लागतं. असंही मत सलमानने व्यक्त केलं आहे.
सलमान खानचा ट्यूबलाइट हा सिनेमा येच्या 25 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ट्यूबलाइट हा सिनेमा कोणत्याही विशिष्ट युद्धावर आधारित नाही. तर युद्धाला सिनेमातील एक भाग म्हणून वापरण्यात आलं आहे, असं स्पष्टीकरण सलमान खानने दिलं आहे. सलमानचा ट्यूबलाइट हा सिनेमा 1962 च्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे, अशी चर्चा सिनेवर्तुळात सुरू होती त्या चर्चेला सलमानने पूर्णविराम दिला आहे. कबीर खान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.