Join us

हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, भारतीय मुस्लिमांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 8:48 AM

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, अशी मागणी इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रमुख डॉ. ए. आर. अंजारिया यांनी केली आहे.

मुंबई-  मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्ल्याचा सूत्रधार व जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला भारताच्या ताब्यात द्या, अशी मागणी इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे प्रमुख डॉ. ए. आर. अंजारिया यांनी केली आहे. अनेक मुस्लिम संघटनांनीही 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवत हाफिजची नजरकैदेतून मुक्तता केल्याबाबतही पाकिस्तानवर टीका केली आहे. तसेच हाफिज सईदला भारताच्या हवाली करण्यासंदर्भात अंजारिया यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खान अब्बासी यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे.हाफीज सईदला भारताच्या हवाली करण्याची मागणीही त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. अब्बासी साहेब, तुम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान झालात म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन, दारिद्र्य आणि दहशतवाद या पाकिस्तानातील दोन महत्त्वाच्या समस्यांशी लढा देण्यासाठी तुमच्या सरकारला अंतःकरणापासून शुभेच्छा देते. दहशतवाद हा इस्लाम आणि पाकिस्तानचा मोठा शत्रू आहे. पाकिस्तानातील आयएसआय आणि लष्कर 60 हून अधिक दहशतवादी संघटनांना रसद पुरवत आहे. ही पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत अंजारिया यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला मोकळं सोडून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मातीतूनच दहशतवाद पोसला जात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे, असं वक्तव्य रझा अकादमीचे सरचिटणीस सईद नुरी यांनी केलं आहे. हाफिज सईदला नजरकैदेतून मुक्त केल्यासंदर्भात रझा अकादमी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलनही करणार आहे.ऑल इंडिया मिली कौन्सिल (महाराष्ट्र) महासचिव एम. ए. खालिद यांनीही हाफिज सईदच्या सुटकेचा निषेध नोंदवला आहे. भारतानं पाकिस्तानला 26/11च्या हल्ल्यात हाफिज दोषी असल्याचे सर्व पुरावे दिले आहेत. तरीही पाकिस्ताननं त्याला मोकळं सोडलं आहे. सईदसारखी माणसं ही शांततेसाठी मोठा धोका आहेत, असंही एम. ए. खालिद म्हणाले आहेत. दहशतवादाला पाठिंबा देऊन पाकिस्तान सरकार दुटप्पी भूमिका निभावत आहे. धर्माच्या नावाखाली एकीकडे स्वतः दहशतवादाला पाठिंबा देत नसल्याचं दाखवायचं तर दुसरीकडे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय संघटना यांनी हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन द्यायचा, पाकिस्तान अशा दुटप्पी भूमिकेतून स्वतःच्या नागरिकांना मूर्ख बनवत असल्याचा आरोपही डॉ. अंजारिया यांनी केला आहे.

टॅग्स :हाफीज सईददहशतवादीदहशतवादमुंबई