मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून मुंबईतील १२ हिंदी भाषिक प्राबल्य असलेल्या मतदारसंघात हिंदी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना उमेदवारीत प्राधान्य द्या अशी मोठी मागणी करण्यात आली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी राष्ट्रवादीचे मुंबई प्रवक्ते आणि हिंदी भाषा विभागाचे अध्यक्ष मनीष दूबे यांनी केली आहे.
मनीष दूबे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, मुंबईतील दहिसर, कांदिवली, मालाड, वर्सोवा, कलिना, अणुशक्तीनगर, दिंडोशी, शिवाजीनगर, वांद्रे पूर्व, कुर्ला, मागाठाणे, अंधेरी पूर्व आणि इतर मतदारसंघात परराज्यातून आलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही लोकसंख्या अनेकदा राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्या समस्येचं आणि मुद्द्यांचे निरसन होत नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच या उमेदवारांमुळे परराज्यातील लोकांना राजकीय प्रतिनिधित्वासह त्यांचा आवाज प्रभावीपणे विधानसभेत पोहचवण्यासाठी मदत होईल. त्याशिवाय समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळेल. हिंदी भाषिक उमेदवाराची निवड ही एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल ठरेल ज्यातून या मतदारसंघातील समस्यांना प्राधान्य मिळून त्यांचा आवाज उठवला जाईल. मविआच्या नेतृत्वात हा निर्णय सर्वसमावेशक निती आणि धोरण मजबूत करेल अशी अपेक्षा मनीष दूबे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आम्ही दिलेल्या या पत्राचा आपण गांभीर्याने विचार कराल आणि या मतदारसंघात हिंदी भाषिक उमेदवारांना संधी देऊन न्याय आणि समतेला प्रोत्साहन द्याल. हिंदी भाषिकाला उमेदवारी दिली तर ते मतदार महाविकास आघाडीसोबत जोडले जातील. ज्याचा फायदा ठाणे, पालघर, मुंबईच्या सर्व विधानसभा मतदारसंघात होईल असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनीष दूबे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मनीष दूबे यांच्या पत्रावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.