"आमदारांना घरं द्या पण त्यांची फार्महाऊस ताब्यात घ्या", राज ठाकरेंचा सणसणीत टोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 09:21 PM2022-04-02T21:21:24+5:302022-04-02T21:22:02+5:30
"आमदारांना कसली घरं वाटता. ते काय उपकार करतात का? मुंबईत इथं इतकी झोपडपट्टी वाढलीय. आधी गरीबांना घरं द्या"
मुंबई
राज्य सरकारकडून मुंबईत आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. "आमदारांना कसली घरं वाटता. ते काय उपकार करतात का? मुंबईत इथं इतकी झोपडपट्टी वाढलीय. आधी गरीबांना घरं द्या", असं राज ठाकरे म्हणाले. गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावत पार पडला. यावेळी मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट नाव घेत टीका केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आमदारांना १०० घरं देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर राज ठाकरे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. "आमदारांना घरं देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. कोणत्या आमदारांनी घर तुमच्याकडे घर मागितलं होतं. मुख्यमंत्र्यांना नेमकं झालंय काय?. बरं आमदारांना घरं देताय ना मग त्यांना घर द्या आणि त्यांची फार्माहाऊसेस ताब्यात घ्या", असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. "आमदार, खासदारांना दिली जाणारी पेन्शन देखील बंद केली पाहिजे. ते काय उपकार करतात का? लोकांचं काम करायला निवडून येता ना? मग पेन्शन हवय कशाला?", असंही राज ठाकरे म्हणाले.
मग मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला आधी सांगावं!
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आधी मला अटक करा, कुटुंबीयांवर कसले हल्ले करता? असं म्हटलं. कुटुंबाला हात लावू नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला महापालिकेत जावू नका हे आधी सांगावं. मुंबईत टक्केवारीचं राजकारण करायचं आणि बिल्डरांच्या घशात मुंबईला घालताना तुम्हाला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एक प्लॉट सापडत नाही का?", असा हल्लाबोल केला.
पंतप्रधानांनी मदरशांवर धाडी टाकाव्यात
"माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे ईडी आणि आयकरच्या जशा धाडी टाकत आहात ना तशा मदरशांवरही धाडी टाका. पाकिस्तानची गरजच कशाला. उद्या काय घडलं तर आतमध्येच इतकं भरून ठेवलं आहे. अनेक मशिदी अशा आहेत त्यात आत काय चालू आहे कळत नाही. काय काय गोष्टी बाहेर येतील त्याने धडकी भरेल. प्रार्थनेला विरोध नाही मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.