राज्यपाल; कालिना संकुलातील इमारतींची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील ६७ पैकी तब्बल ३८ इमारतींकडे महापालिकेचा ‘निवासी दाखला’ (ओसी) नाही. यातील अनेक इमारती जुन्या आहेत. यात ग्रंथालय, शिक्षकांचे निवासगृह, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, उपाहारगृह, आयटी पार्क, मराठी भवनपासून ते अगदी परीक्षा भवन आणि आयडॉल इमारतींचा समावेश आहे. ओसी नसल्यामुळे संकुलातील या इमारतींना पाणी, स्वच्छतागृहे, साफसफाईसारख्या अनेक सुविधांपासूनही वंचित राहावे लागत आहे. याचा थेट परिणाम तेथे कार्यरत कर्मचारी, अधिकारी आणि कामासाठी, शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत आहे. ही राष्ट्रीय संपदेची नासाडी आहे, असे नमूद करून इमारतींमधील त्रुटी दूर करून विद्यापीठाला इमारतींच्या वापराबाबत ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यपाल कोश्यारी यांनी बुधवारी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसराला भेट दिली व विविध विभागांसह इमारतींची पाहणी केली. ज्यामध्ये नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरिअम, सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, परीक्षा भवनाची नवीन इमारत, जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांना त्यांनी वरील सूचना दिल्या. तसेच विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत बांधकाम पूर्ण झालेल्या व वापरात नसलेल्या इमारती याबाबतही सविस्तर माहिती देण्याच्या सूचना विद्यापीठाला दिल्या.
विद्यापीठाच्या मागील सिनेट बैठकीत इमारतीच्या कार्यालयामधील विविध कामे ही निकृष्ट दर्जाची केलेली असल्याचा मुद्दा सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि इतर सिनेट सदस्यांनी मांडला होता. यासाठी समिती स्थापन करून सदर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही सावंत यांनी केली होती. राज्यपालांच्या सूचनेनंतर इमारतीला ओसी मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
राज्यपालांनी या वेळी संकुलातील डॉ. आंबेडकर भवन, नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी केंद्र, इन्क्युबेशन फॉर डेव्हलपिंग आंत्रप्रेन्युअरशिप अँड स्टार्ट अप केंद्र, हरित तंत्रज्ञान भवन, स्कूल ऑफ बेसिक सायन्सेस, नवे परीक्षा भवन व जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे भेट दिली तसेच प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी केली.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि प्राधिकरणातील सदस्य उपस्थित होते.