आपत्कालीन परिस्थितीत उपचारांना महत्त्व द्या : डॉक्टर

By admin | Published: September 27, 2016 04:02 AM2016-09-27T04:02:03+5:302016-09-27T04:02:03+5:30

दंगल, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ला अशा घटनांनंतर जखमींना सर्वांत महत्त्वाचे असतात ते उपचार. त्यांना तत्काळ चांगले उपचार देण्यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी बाहेरून भेटायला

Give importance to treatment in emergencies: Doctor | आपत्कालीन परिस्थितीत उपचारांना महत्त्व द्या : डॉक्टर

आपत्कालीन परिस्थितीत उपचारांना महत्त्व द्या : डॉक्टर

Next

मुंबई : दंगल, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ला अशा घटनांनंतर जखमींना सर्वांत महत्त्वाचे असतात ते उपचार. त्यांना तत्काळ चांगले उपचार देण्यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी बाहेरून भेटायला येणाऱ्या व्यक्तींमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा घटनांनंतर राजकीय नेतेही गर्दी करतात. या वेळी राजकीय नेत्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, अशी अपेक्षा डॉक्टरांनी आपत्कालीन व्यवस्थापन परिषदेत व्यक्त केली.
सोमवारी नायर रुग्णालयात एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला २३ महापालिका रुग्णालयांतील आणि राज्यातील विविध रुग्णालयांतील डॉक्टर्स सहभागी झाले होते. या वेळी आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांनी रुग्णांची आणि स्वत:ची काळजी कशी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत पालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर, प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश मोहिते, डॉ. गौतम काळे, डॉ. पवन साबळे, डॉ. पंकजा अलग, अ‍ॅड. महेंद्रकुमार वाजपेयी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपत्कालीन परिस्थितीत जखमींना मदत करण्याचा ओघ वाढतो. पण, काहीवेळा खऱ्या गरजूंना ही मदत मिळत नाही. तर, अन्य व्यक्ती ही मदत लाटतात. अशाप्रकारे वागणे हा डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा आहे. त्याचबरोबर अफवा पसरवणे हाही गुन्हा असल्याचे डॉ. शैलेश मोहिते यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांनाही आपत्कालीन परिस्थितीत जखमींवर उपचार करणे बंधनकारक आहे, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

मुंबईसारख्या शहरांमध्ये कधीही हाय अलर्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्वच रुग्णालयांनी सज्ज असायला हवे. त्यासाठी सर्व रुग्णालयांकडे आपत्कालीन उपाययोजनांचा आराखडा तयार असायला हवा, असे महेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्वच रुग्णालयांना सेवा देणे बंधनकारक असल्याचे अ‍ॅड. महेंद्रकुमार वाजपेयी यांनी सांगितले.

Web Title: Give importance to treatment in emergencies: Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.