पावसाळ्यात वाहतूक कोंडीची माहिती द्या! आपत्ती व्यवस्थापन विभागाची महापालिकेला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 01:09 PM2023-06-16T13:09:26+5:302023-06-16T13:09:40+5:30
बंगळुरूच्या धर्तीवर ॲप, पर्यायी मार्गही सुचवले जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. ही समस्या सोडविण्यासाठी आता राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सरसावला आहे. पाणी साचलेल्या, वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणांची माहिती थेट नागरिकांच्या मोबाइल ॲपवर द्या. त्याचप्रमाणे पर्यायी मार्गही ॲपद्वारे सुचवा, अशा सूचना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पालिकेच्या आपत्ती विभागाला केली आहे.
मुंबईत कोस्टल रोड, मुंबई मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक रोड अशा विविध विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे पाऊस जोरात सुरू झाल्यानंतर अनेक भागांत पाणी तुुंबण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबून वाहतुकीवर परिणाम होणाऱ्या भागाची, रस्त्यांची माहिती नागरिकांना मोबाइल ॲपच्या माध्यमातून कळविण्याबाबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांनी पत्राद्वारे आपत्ती व्यवस्थापन विभागाला पर्याय सुचविला आहे.
बंगळुरूच्या धर्तीवर ॲप
बंगळुरू शहरात अतिवृष्टी होऊन पाणी साचल्याची सूचना तत्काळ नागरिकांना ॲपद्वारे मिळते. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास त्या मार्गाऐवजी इतर पर्यायी मार्ग निवडावा, अशा सूचना दिल्या जातात.
त्याच धर्तीवर बंगळुरूतील शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधून अशी यंत्रणा मुंबईतही लागू करता येईल, याबाबत विचार करावा, अशी सूचना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांना करण्यात आली आहे.