मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील तीन वर्षांत भटक्या श्वानांनी तब्बल सुमारे सव्वादोन लाख लोकांना दंश केला असून, यात मृत्यू झालेल्यांचा आकडा १६ एवढा आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने निर्बीजीकरणासह रेबिजच्या इंजेक्शनची मात्रा वापरली असली तरी अद्याप जालीम उपाय सापडलेला नाही. त्यातच आता पसरणाऱ्या लेप्टोला आळा घालता यावा म्हणून रस्त्यांवर भटकणाऱ्या श्वानांसह घराघरात पाळण्यात येणाऱ्या श्वानांना लेप्टोचे इंजेक्शन देण्यात यावे, अशा आशयाची सूचना पुढे आली आहे.महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाचा ७ कोटींचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा विषय गंभीर असल्याने स्थायी समितीच्या सदस्यांनी प्रस्तावाला एकमताने मंजुरीही दिली. मात्र प्रस्ताव मंजूर होत असतानाच सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी मुंबई आणि उपनगरात प्रत्यक्षात भटक्या श्वानांची संख्या किती आहे? किती लोकांना श्वानदंश झाला आहे? भटक्या श्वानांवरील निर्बीजीकरणासाठी किती कर्मचारी कार्यरत आहेत, अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करत यासंबंधी माहिती प्रशासनाला विचारली. विनोद शेलार यांनीही यासंबंधी प्रश्न उपस्थित करत भटक्या श्वानांची गणना नेमकी कशी केली जाते, असा थेट सवाल प्रशासनाला केला. संबंधित विभागात कर्मचाऱ्यांच्या किती जागा रिक्त आहेत? या जागा कधी भरणार? असे सवाल उपस्थित केले. शिवाय संबंधित विभागातील कर्मचारी वयोवृद्ध अथवा निवृत्त होण्यास आल्याने नव्या कर्मचाऱ्यांची भरती कधी करणार, हे प्रश्न उपस्थित केले. तर रमेश कोरगावकर यांनीही भटक्या श्वानांच्या जाचाचा विषय उपस्थित करत यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, असा मुद्दा मांडला. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी याविषयी आणखी खोलवर जात भटक्या श्वानांसह घराघरात पाळल्या जाणाऱ्या श्वानांना लेप्टोचे इंजेक्शन देण्यात यावे, अशी सूचना केली. कारण ज्याप्रमाणे म्हैस किंवा उंदरापासून लेप्टोचा आजार पसरतो, तसा तो कुत्र्यांपासून पसरत असल्याने भटक्या श्वानांसह घराघरात पाळलेल्या श्वानांना लेप्टोचे इंजेक्शन दिल्यास यासंबंधीच्या आजाराला आळा घालता येईल, असे नमूद केले. शिवाय श्वानांचे निर्बीजीकरण करताना, त्यांना रेबिजचे इंजेक्शन देताना लेप्टोच्या इंजेक्शनची भर घातली तर उत्तमच होईल, असे नमूद केले. (प्रतिनिधी)
भटक्या श्वानांना लेप्टोचे इंजेक्शन द्या
By admin | Published: December 17, 2015 2:26 AM