Join us  

चिंचणीला तत्काळ पाणी द्या

By admin | Published: June 17, 2014 1:05 AM

डहाणूच्या चिंचणी गावातील रिफाईनगरी (बायपास) येथे आज दुपारी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी भेट देवून तिथे तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे आदेश

डहाणू : गेल्या दहा वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या डहाणूच्या चिंचणी गावातील रिफाईनगरी (बायपास) येथे आज दुपारी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी भेट देवून तिथे तत्काळ पाणी पुरवठा करण्याचे आदेश चिंचणी ग्रा. पं. प्रशासनाला दिले. शिवाय रस्ते, सार्वजनिक शौचालय करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.डहाणू तालुक्यातील सर्वात मोठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीने चिंचणी सागरी महामार्गाजवळ असलेल्या रिफाईनगरी येथे गेल्या दहा वर्षांपासून पाणी, रस्ते, शौचालय इ. नागरी सुविधा न पुरविल्याने येथील हजारो ग्रामस्थ चिंचणी ग्रामपंचायत विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत होते. येथील ग्रामस्थ ग्रा. पं. कडे वेळोवेळी मालमत्ता कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी इ. कर भरूनही येथील लोकांना पंचायतीकडून कोणतीच सोयीसुविधा उपलब्ध करून दिली जात नसल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे येथील लोकांना दरवर्षी पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली, परंतु ग्रामपंचायत येथील लोकांसाठी कोणतीच उपाययोजना करीत नव्हती.दरम्यान, आज दुपारी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी येथील वस्तीला भेट देवून येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी उपस्थित ग्रामसेवक सुभाष किणी, गटविकास अधिकारी रमेश आवचार, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश पवार यांना दोन दिवसात पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले. यावेळी गावितांनी येत्या दोन महिन्यात सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याने येथील नागरिकांनी राज्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी कार्यकर्ते, पुढारी तसेच अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहरा)