सह्या द्या; मृत्यू दाखला न्या

By admin | Published: August 2, 2014 01:17 AM2014-08-02T01:17:08+5:302014-08-02T01:17:08+5:30

एकीकडे स्मशानभूमींच्या ठिकाणी सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असताना यावर उपाय शोधण्याऐवजी आता पालिकेने वेगळा फंडा अवलंबला आहे

Give it; Take the death certificate | सह्या द्या; मृत्यू दाखला न्या

सह्या द्या; मृत्यू दाखला न्या

Next

अजित मांडके, ठाणे
एकीकडे स्मशानभूमींच्या ठिकाणी सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असताना यावर उपाय शोधण्याऐवजी आता पालिकेने वेगळा फंडा अवलंबला आहे. यानुसार, ज्या स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्या ठिकाणी अंत्यसंस्काराला येणाऱ्या मृताच्या पाच नातेवाइकांनी महापालिकेच्या पावतीवर नावे आणि स्वाक्षऱ्या केल्या तरच संबंधितांना मृत्यू दाखला दिला जाईल, असा अजब फतवा काढला आहे.
ठाणे महापालिकेच्या ३७ स्मशानभूमी आहेत़ तर खासगी २२ स्मशानभूमी असून यामध्येम हिंदू -३, ख्रिश्चन - ३, मुस्लिम -११, बोहरा समाज - २, पारशी -०१ आणि ज्यू स्मशनभूमी ०१ अशा एकूण ५९ स्मशानभूमी आहेत. परंतु, सध्याच्या वाढीव लोकसंख्येच्या मानाने त्या कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मानपाडा गावातील स्मशानभूमीत अर्धवट अवस्थेत असलेल्या मृतदेहावरून महासभेत गोंधळ झाला होता. त्यानंतर आता शहरातील एकूणच स्मशानभूमींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या महापालिकेच्या ३७ स्मशानभूमी असल्या तरी प्रत्यक्षात २५ सुरक्षारक्षकांवरच त्यांची जबाबदारी आहे. ज्या महत्त्वाच्या आणि मोठ्या स्मशानभूमी आहेत़ त्याच ठिकाणी हे सुरक्षारक्षक ठेवण्यात येत असल्याची माहिती सुरक्षारक्षक विभागामार्फत देण्यात आली़ दुसरीकडे या स्मशानभूमींच्या ठिकाणी आवश्यक असलेला कर्मचारीवर्ग हासुद्धा तुटपुंजा आहे.
३७ स्मशानभूमींपैकी केवळ २ ठिकाणी म्हणजेच जवाहरबाग आणि जयभवानीनगर वागळे इस्टेट येथे क्लार्क आहेत. परंतु, उर्वरित एकाही ठिकाणी क्लार्क नसून यातील काही ठिकाणी सफाई कर्मचारीच ते काम करीत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे कोणत्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार होतात, याची माहितीसुद्धा पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सगळाच गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने पालिकेने आता नवा फंडा शोधला आहे. यानुसार ज्या स्मशानभूमीत कर्मचारी नसतील त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाइकांना रुग्णालयाकडून, मृत्यू दाखला मिळावा, यासाठी जी पावती दिली जाते, त्या पावतीवर त्यांची नावे आणि स्वाक्षऱ्या द्याव्या लागणार आहेत. तसे केले तरच मृत्यू दाखला दिला जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, यासंदर्भातील कोणत्याही स्वरूपाचे लेखी आदेश मात्र पालिकेच्या संबंधित विभागाकडून काढण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, आता पालिकेने शहरातील काही महत्त्वाच्या स्मशानभूमींत कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी आरोग्य विभागात एक बैठकही झाली. महापालिकेच्या अभ्यासानुसार प्रत्येक स्मशानभूमीत क्लार्क, सफाई कर्मचारी, लाकूडवाला आणि वॉचमन असे सुमारे एका स्मशानभूमीत १२ कर्मचारी आवश्यक राहणार आहेत. परंतु, त्यांचा खर्च उचलणे पालिकेला शक्य नसल्याने त्यामुळे महत्त्वाच्या सात ते आठ स्मशानभूमींतच हे कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी ठेवले जाणार आहेत.

Web Title: Give it; Take the death certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.