‘जीवनदायी’ला बाळासाहेबांचे नाव द्या
By admin | Published: August 7, 2015 01:41 AM2015-08-07T01:41:10+5:302015-08-07T01:41:10+5:30
गोरगरिबांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नामांतर करून त्यास दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या
मुंबई : गोरगरिबांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नामांतर करून त्यास दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, असे पत्र सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
सेनेच्या या मागणीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी टीका केली असून, दुसऱ्याच्या नावावरच्या योजनेला स्वत:चे नाव लावणे बाळासाहेबांनाही आवडले नसते. त्याऐवजी त्यांच्या नावाने दुसरी एखादी चांगली योजना सुरू करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. भाजपा प्रणीत सरकार सत्तेवर आल्यापासून शासकीय योजनांची नावे बदलली जात आहेत. याआधी संत गाडगेबाबांच्या नावाने सुरू असलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाचे नाव बदलून टाकले होते. त्यावरून टीकाही झाली होती. तरीही आता जीवनदायी योजनेचे नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत मंत्री डॉ. सावंत म्हणाले, युती शासनाच्या काळात जीवनदायी योजना सुरू झाली होती. त्यामुळेच त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे.