मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमधील ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
सरकारी सेवेत असताना कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची ग्वाही केंद्र शासनाने दिली आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक ८ मे २०२१ रोजी काढण्यात आले आहे. हा आदेश केंद्राच्या अखत्यारीतील सर्व आस्थापनांना लागू पडतो. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करून मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कोरोनाने मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस तथा मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी अध्यक्ष राजीव जलोटा यांच्याकडे केली आहे.
घरातील कमावती व्यक्ती कोरोनाने हिरावून नेल्याने पोर्ट ट्रस्टमधील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोना संकट दिवसागणिक गहिरे होत असतानाही सर्व कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या या देशसेवेची दखल घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी. जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल, अशीही मागणी करण्यात आली.