‘जॉइंट व्हेंचर’वरील गिरण्यांत कामगारांच्या मुलांना रोजगार द्या - सचिन अहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:12 AM2018-04-21T03:12:08+5:302018-04-21T03:12:08+5:30
मुंबईतील एनटीसीच्या ‘जॉइंट व्हेंचर’वर चालविण्यात येणाऱ्या चार गिरण्यांमध्ये रेडिमेड गारमेंटद्वारे गिरणी कामगारांच्या बेरोजगार मुलांना रोजगार द्या, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दिल्ली एनटीसी व्यवस्थापनाकडे केली आहे.
मुंबई: मुंबईतील एनटीसीच्या ‘जॉइंट व्हेंचर’वर चालविण्यात येणाऱ्या चार गिरण्यांमध्ये रेडिमेड गारमेंटद्वारे गिरणी कामगारांच्या बेरोजगार मुलांना रोजगार द्या, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने दिल्ली एनटीसी व्यवस्थापनाकडे केली आहे. या प्रश्नावर फार काळ गप्प बसणार नसल्याचा इशाराच संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे.
परेल येथील एनटीसीच्या टाटा मिलमधील काही बदली कामगारांना संघटनेने केलेल्या प्रयत्नांमुळे कायम करण्यात आले. त्या कामगारांना अहिर यांच्या हस्ते कायम पास वितरित करण्यात आले. या वेळी संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, कंपनीचे महाप्रबंधक ए.के. सिंह, कंपनीचे वरिष्ठ मनोज कुमार आदी उपस्थित होते.
कराराप्रमाणे जॉइंट व्हेंचरच्या गोल्ड मोहर, अपोलो, इंडिया युनायटेड नंबर १ आणि न्यू सिटी या चार गिरण्यांत बेकार होणाºया सुमारे ६ हजार कामगारांना रोजगार देण्यात येणार होता. कामगारांसह त्यांच्या मुलांनाही रोजगार देण्यात येऊन सुमारे १० हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होणार होता. या रेडिमेड उद्योगाच्या भागीदारीत काही ब्रँडेड रेडिमेड कंपन्या उतरल्या होत्या. प्रारंभी कामकाज चालू असल्याचे भासविण्यात आले. पण पुढे काम मंदावले आणि कामगार किंवा एकाही कामगाराच्या मुलाला रोजगार देण्यात आलेला नाही. या प्रश्नी संघटनेने आंदोलन छेडले आणि लेखी निवेदनाद्वारे एनटीसीचे लक्षही वेधले होते. दरम्यान, केंद्रात सत्ताबदल झाला. पण कामगारांच्या या प्रश्नावर विरोधी धोरण अनुसरले जात आहे. म्हणूनच संघटनेने पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
१९८२ च्या संपानंतर कामावर आलेल्या कामगारांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी एनटीसीने द्यावी, ही आमची मागणी आहे. या दोन्ही मांगण्यांसाठी अखेर संघटनेला रस्त्यावर उतरावे लागेल.
- सचिन अहिर,
अध्यक्ष-राष्ट्रीय मिल मजदूर संघ