मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:02 AM2023-09-04T07:02:04+5:302023-09-04T07:02:40+5:30
‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न’
मुंबई : राज्यात ३४ टक्के मराठा समाज आहे. त्यांचा अंत पाहू नका. सत्तेचा उपयोग करून मराठा समाजाला न्याय द्या, अशी विनंती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांना केली. शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचा ५७ वर्षांचा राजकीय प्रवास आणि लोकाधिकार चळवळीच्या लढ्याच्या घटनाक्रमावर आधारित ‘’शिवसेना, लोकाधिकार आणि मी’’ या
पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, आदी उपस्थित होते.
‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, स्थानीय लोकाधिकार समितीचा इतिहास कीर्तिकर यांनी पुस्तकात मांडला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली. मराठी माणसांना नोकरी मिळावी यासाठी त्याकाळी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थानीय लोकाधिकार समितीने काम केले. संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे काम केले. नीती आयोगाने मुंबई विकासासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. यंत्रणांना एकत्र आणून रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार आहोत.