एलएलएमची प्रश्नपत्रिका मराठीतून द्या, सिनेट सदस्यांची कुलगुरुंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 11:02 PM2019-03-18T23:02:01+5:302019-03-18T23:02:22+5:30
पारदर्शकतेसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याचीही मागणी
मुंबई - मुंबई विद्यार्थी जवळपास ३००० हजार विद्यार्थी एलएलएमच्या परीक्षेसाठी अर्ज करतात. ही परीक्षा देताना ती मराठीतून सोडविण्याची मुभा असली तरी प्रश्नपत्रिका इंग्रजीत असल्याने अनेक विद्यार्थ्याचा गोंधळ उडतो. त्यामुळे येणाऱ्या एलएलएम परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्याना मराठीतून प्रश्नपत्रिका द्यावी अशी मागणी सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांना निवेदन दिले आहे.
विधी शाखेच्या पदवी (एलएलबी) परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना मराठीतून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. पदव्युत्तर (एलएलएम) अभ्यासक्रमासाठीही इंग्रजीबरोबरच मराठीतूनही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची फार जुनी मागणी आहे. विद्यार्थ्यांना मराठीतून उत्तरे लिहिण्याची मुभा आहे. परंतु, प्रश्नपत्रिका इंग्रजीतूनच दिली जात असल्याने काही प्रश्न समजून घेताना अडचण होते. यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी या संदर्भातले आपले निवेदन परीक्षा विभागाला यापूर्वी दिलेले आहे. मात्र एलएलएम हा अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकविला जातो. या विषयाची संदर्भ पुस्तके किंवा अभ्यासासाठी लागणारे सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निर्णय इंग्रजीतून आहेत, अशी कारणे देत गेली अनेक वर्षे विद्यापीठ प्रशासनाकडून या विषयाची टाळाटाळ होत आहे.
या मागणी सोबतच एलएलएमसाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेत असतात मात्र प्रवेशाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने त्यात अनेक गैरप्रकार घडत असल्याची माहिती सिनेट व अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. गैरप्रकारांमुळे आणि चुकीचं प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी दोघांना अनेकदा न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते. हा त्रास कमी व्हावा आणि एलएलएमची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी या हेतून ती ऑनलाईन करण्याची मागणी सिनेट सदस्य आणि युवासेनेमार्फत कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.